क्रांतियुग

 

क्रांतियुग

क्रांतियुग

मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या घटनेस

क्रांती' असे म्हणतात. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध, फ्रेंच राज्यक्रांती आणि

औद्योगिक क्रांती या असे बदल घडवून आणणाऱ्या घटना होत्या.

त्यांचा कालखंड म्हणजे अठरावे शतक हे क्रांतियुग म्हणून ओळखले

जाते. या पाठात आपण या तीन घटनांचा परिचय करून घेऊया.

 

अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध

अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपातील अनेक लोक तेथे येऊन

स्थायिक झाले. १६०७ ते १७३३ या काळात इंग्रजांनी उत्तर अमेरिकेत

तेरा वसाहती स्थापन केल्या.

 

वसाहतींसंबंधी इंग्लंडचे धोरण : इंग्लंडमधील सरकारने उत्तर

अमेरिकेतील या वसाहतींवर प्रशासन करायला सुरुवात केली. वसाहतींनी

धान्य, तंबाखू, साखर इत्यादी माल इंग्लंडला विकावा, अशी इंग्लंडच्या

राज्यकर्त्यांची धारणा होती. इंग्लंडने आपल्या मालाशी स्पर्धा करेल असा

माल तेथे तयार करण्यावर बंदी घातली. इंग्लंडने वसाहतींतील चहा,

साखर इत्यादी मालावर कर बसवले.

 

इंग्लंडविषयी वसाहतींमध्ये तीव्र असंतोष : इंग्लंडच्या जाचक

बंधनातून मुक्त होणे आवश्यक आहे, असे वसाहतींना वाटू लागले. जॉर्ज

वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन त्यांनी

इंग्लंडविरुद्ध बंड पुकारले.

 

बोस्टन टी पार्टी : वसाहतींवरील निर्बंध इंग्लंडने रद्द करावे,

वसाहतींना त्यांचा राज्यकारभार करू दयावा, अशी मागणी तेथील

नागरिक करू लागले. इंग्लंडने याला नकार देताच वसाहतींनी इंग्लंडच्या

 

बोस्टन टी पार्टी

मालावर बहिष्कार टाकला. १७७३ साली अमेरिकेतील बोस्टन बंदरात

उभ्या असलेल्या इंग्लिश जहाजांवरील चहाच्या पेट्या काही नागरिकांनी

समुद्रात फेकून दिल्या. यालाच 'बोस्टन टी पार्टी' असे म्हणतात.

ना प्रतिनिधी, ना कर: इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये वसाहतींचे

प्रतिनिधी नव्हते. त्यामुळे वसाहतींसंबंधी कायदे करण्याचा व कर

लादण्याचा अधिकार इंग्लंडच्या पार्लमेंटला नाही, अशी स्पष्ट

भूमिका वसाहतींनी घेतली. 'ना प्रतिनिधी, ना कर' अशी घोषणा

त्यांनी केली. इंग्लंडच्या सरकारने वसाहतींच्या मागण्या धुडकावून

लावल्या. त्याचे पर्यवसान इंग्लंड व वसाहती यांच्या युद्धामध्ये

झाले. वसाहतींच्या सैन्याचे नेतृत्व जॉर्ज वॉशिंग्टनकडे होते.

 

 

 

स्वातंत्र्याचा जाहीरनामा :

 

४ जुलै १७७६ रोजी वसाहतींनी आपल्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा

घोषित केला. तो तयार करण्यात थॉमस जेफरसन याने महत्त्वाची

भूमिका बजावली होती. सर्व मानव समान आहेत; जीवित, स्वातंत्र्य व

सुखाचा शोध घेणे हे मानवाचे मूलभूत हक्क आहेत; या हक्कांची

पायमल्ली करणारे सरकार बदलण्याचा अगर उलथून टाकण्याचा

अधिकार लोकांना आहे,' असे या जाहीरनाम्यात घोषित करण्यात आले.

 

थॉमस जेफरसन

वसाहतींना स्वातंत्र्ययुद्धात विजय मिळाला आणि १७८३ मध्ये

इंग्लंडने त्यांचे स्वातंत्र्य मान्य केले. जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले

राष्ट्राध्यक्ष झाले. तेरा वसाहतींनी १७८९ साली अमेरिकेचे संघराज्य

स्थापन केले. ‘अमेरिकेची संयुक्त संस्थाने' (U. S. A.) या नावाने हा

देश ओळखला जाऊ लागला. अमेरिका हे पहिले लोकशाही,

प्रजासत्ताक संघराज्य ठरले. जगात प्रथमच लिखित राज्यघटनेचा प्रयोग

करण्यात आला.

अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाने फ्रान्समधील क्रांतिकारकांना प्रेरणा

मिळाली. तसेच एकोणिसाव्या व विसाव्या शतकांत वसाहतवादविरोधी

लढ्यांसाठी हे स्वातंत्र्ययुद्ध स्फूर्तिदायी ठरले.

 

फ्रेंच राज्यक्रांती

फ्रान्समध्ये अनियंत्रित राजेशाही होती. तेथील लोकांनी एकत्र येऊन

अनियंत्रित राजेशाही व सामंतशाहीचा पाडाव केला. लोकशक्तीचा असा

आविष्कार जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाला. आज जगभर अनेक

राष्ट्रांनी जी लोकशाही शासनपद्धती स्वीकारलेली दिसते, तिचा प्रसार

या राज्यक्रांतीपासून झाला, म्हणूनच फ्रेंच राज्यक्रांतीपासून आधुनिक

जगाच्या इतिहासाची सुरुवात झाली, असे मानले जाते.

फ्रान्समधील राज्यकर्ते विलासी बनले होते. बाहेरच्या जगातील

घडामोडींकडे त्यांचे लक्ष नव्हते. प्रजेच्या कल्याणासाठी ते काहीही करत

नव्हते. आर्थिक दिवाळखोरी माजली होती. त्यामुळे जनतेची

राजाविषयीची निष्ठा कमी होऊ लागली.

 

सामाजिक विषमता : या काळात फ्रान्समध्ये सामाजिक विषमता

तीव्र झाली होती. फ्रेंच समाजात तीन वर्ग होते. पहिला वर्ग वरिष्ठ

धर्मगुरूंचा व दुसरा वर्ग अमीर उमरावांचा होता. या दोन वर्गांचे

संख्याबळ फ्रान्सच्या लोकसंख्येत नगण्य होते, पण देशाच्या जमिनीपैकी

सुमारे ऐंशी टक्के जमीन त्यांच्या मालकीची होती. याशिवाय त्यांना

अनेक सवलती असत. हे वर्ग ऐषारामी जीवन जगत होते. तिसऱ्या वर्गात

व्यापारी, वकील, डॉक्टर, शिक्षक, शेतकरी कामकरी, भूदास इत्यादींचा

समावेश होता. त्या वर्गातील लोकांचे उत्पन्न कमी असूनही कराचा सर्व

बोजा त्यांच्यावरच होता. वरिष्ठ वर्ग व सामान्य लोक यांच्यात मोठी

सामाजिक व आर्थिक विषमता निर्माण झाली होती. या विषमतेला सुरुंग

लावण्याचे काम तिसऱ्या वर्गाने केले.

-

फ्रान्समध्ये माँटेस्क्यू, व्हॉल्टेअर व रूसो या विचारवंतांनी नवे

विचार मांडले. कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ आणि न्यायमंडळ हे

शासनयंत्रणेचे घटक एकमेकांपासून स्वतंत्र असावेत, हा सत्ताविभाजनाचा

सिद्धान्त माँटेस्क्यूने मांडला. व्हॉल्टेअरने सामाजिक विषमतेवर टीकेची

झोड उठवली. रूसोने 'सामाजिक करार' या ग्रंथातून जनतेच्या

सार्वभौमत्वाचा सिद्धान्त मांडला. 'मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो.

समाजाचा गाडा सुरळीत चालावा, म्हणून जनता स्वतःवर काही बंधने

लादून घेते. त्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यवस्था निर्माण करते. ती

ईश्वरदत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते. जर

राज्यसंस्थेने कराराचा भंग केला, तर ती राज्यव्यवस्था उलथून टाकण्याचा

नैसर्गिक व नैतिक अधिकार समाजाला असतो.' त्याच्या या विचारांमुळे

रूसो हा फ्रेंच राज्यक्रांतीचा उद्गाता मानला जातो.

फ्रान्समधील विचारवंतांनी व्यक्तिस्वातंत्र्याला महत्त्व दिले.

अंधश्रद्धांना विरोध केला. नव्या उदयोगधंदयांचा विकास त्यांना

आवश्यक वाटू लागला. फ्रान्समध्ये नव्या विचारांचे वारे वाहू लागले.

त्यामुळे फ्रेंच राज्यक्रांतीला चालना मिळाली.

बॅस्टिलचा पाडाव : फ्रान्समधील जनतेच्या हालअपेष्टा वाढत

गेल्या. त्यामुळे जनतेतील असंतोष पराकोटीला गेला आणि क्रांतीचा

भडका उडाला. संतप्त जमावाने १४ जुलै १७८९ रोजी बॅस्टिल तुरुंगावर

हल्ला केला. हा तुरुंग अनियंत्रित राजेशाही व अन्यायाचे प्रतीक होता.

 

 

बॅस्टिलचा पाडाव

बॅस्टिलच्या तुरुंगावरील हल्ला म्हणजे सामान्य जनतेने अनियंत्रित

सत्ताधीशांवर केलेला प्रहार होता.

मानवी हक्कांचा जाहीरनामा : क्रांतिकारकांनी मानवी हक्कांचा

जाहीरनामा प्रकाशित केला. या जाहीरनाम्यात स्वातंत्र्य, मालमत्ता व

जीविताची सुरक्षितता, अन्यायाचा प्रतिकार हे मानवाचे मूलभूत अधिकार

आहेत, असे नमूद करण्यात आले होते. संतप्त जनतेने फ्रान्समधील

सामंतशाही उलथून टाकली. राजा सोळावा लुई याचा शिरच्छेद करून

जनतेने राज्य स्थापन केले. फ्रेंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता व बंधुता

ही बहुमोल तत्त्वे जगाला दिली. जनतेच्या सार्वभौमत्वाचे तत्त्व

प्रस्थापित केले. जगातील अनियंत्रित राजेशाहीविरुद्धच्या व पारतंत्र्यातील

देशांच्या लढ्यांना ही क्रांती प्रेरणादायी ठरली, म्हणून मानवी

इतिहासामध्ये फ्रेंच राज्यक्रांतीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 

 

औद्योगिक क्रांती

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपमध्ये औद्योगिक क्षेत्रात

क्रांतिकारी बदल घडून येऊ लागले. बाष्पशक्तीवर चालणाऱ्या यंत्रांच्या

साहाय्याने उत्पादन होऊ लागले. पुढे विदयुतशक्तीचा वापर सुरू झाला.

उदयोगांची जागा घरगुती कारखान्यांनी घेतली. हातमागाऐवजी यंत्रमागाचा वापर

सुरू झाला. आगगाडी आणि आगबोटीसारखी वाहतुकीची नवी

साधने आली. यंत्रयुग अवतरले. ही क्रांती इंग्लंडमध्ये सुरू झाली

आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्त्य जगात पसरत गेली. इंग्लंडची

औद्योगिक भरभराट तर इतकी मोठी होती, की इंग्लंडचे वर्णन 'जगाचा

कारखाना' असे केले जाऊ लागले.

 

 

औद्योगिक क्रांतीचे परिणाम

औद्योगिक क्रांतीमुळे युरोपच्या आर्थिक प्रगतीस वेग आला.

विविध प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन वाढले. अंतर्गत व आंतरराष्ट्रीय

व्यापार वाढला. वाहतुकीच्या व दळणवळणाच्या साधनांतील प्रगतीमुळे

व्यापारात चांगली वाढ होऊ शकली. कारखानदारीमुळे वस्तूंचे उत्पादन

मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. रोजगारात बरीच वाढ झालेली होती.

त्यामुळे वस्तू विकत घेण्याची सामान्य जनतेची क्षमता वाढली. विविध

वस्तू व स्वस्त भाव यांमुळे सर्वसामान्य जनतेचे राहणीमान सुधारण्यास

मदत झाली.

आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नव्या बाजारपेठांची गरज प्रकर्षाने भासू

 

 

लागली. अतिरिक्त भांडवल, आधुनिक यंत्रसामग्री व सुसज्ज सैन्य

यांच्या बळावर युरोपीय राष्ट्रांनी आशिया व आफ्रिका खंडांत साम्राज्य

विस्तार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अविकसित राष्ट्रांचे स्वातंत्र्य

नष्ट झाले. ती साम्राज्यवादी राष्ट्रांना कच्चा माल पुरवणारी हुकमी

बाजारपेठ बनली. भारतसुद्धा या प्रक्रियेचा बळी ठरला.

औद्योगिक क्रांतीमुळे शहरांची वाढ झाली. तेथे सुशिक्षित

समाजाची वाढ झाली. त्याला आपल्या हक्कांची जाणीव होऊ लागली.

त्यामुळे इंग्लंड व फ्रान्ससारख्या देशांत लोकशाहीचा विकास होण्यास

मदत झाली. युरोपात नवी शहरे उदयास आली. पारंपरिक उद्योगधंदे

नष्ट झाले. खेडी ओस पडू लागली. औद्योगिक शहरांमध्ये लोकांचे

लोंढे येऊ लागले. असंख्य कामगार गलिच्छ वस्त्यांमधून राहू लागले.

सार्वजनिक स्वच्छतेच्या अभावी रोगराई पसरू लागली. कामगार

हलाखीचे जीवन जगू लागले.

आर्थिक विषमतेमुळे येणाऱ्या राजकीय व सामाजिक विषमतेविरुद्ध

औदयोगिक राष्ट्रांमध्ये चळवळी उभ्या राहू लागल्या. उद्योगपती व

कामगार संघटना यांच्यामध्ये संघर्ष वाढू लागला. समान हक्कांसाठी

कामगार चळवळी, त्याचप्रमाणे स्त्रियांच्या चळवळी युरोपीय राष्ट्रांमध्ये

सुरू झाल्या. या चळवळींचे फलित म्हणून युरोपमध्ये कल्याणकारी

राज्याची कल्पना दृढ झाली. सर्वसामान्य माणसाचे जीवनमान सुधारले.

सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सामान्य माणसाच्या जीवनाचे पडसाद

उमटले. लघुकथा व कादंबरी हे नवे वाङ्मयप्रकार उदयास आले.

चित्रकलेत सामान्य माणसाचे जीवन चितारले जाऊ लागले. पुढे विसाव्या

शतकात तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे चित्रपट कलेचाही विकास झाला.

अविभक्त कुटुंब पद्धतीचा हास सुरू झाला. परंपरावाद,

 

अंधश्रद्धा यांचा प्रभाव कमी होऊ लागला. बुद्धिप्रामाण्यवादाचा प्रसार

होण्यास मदत झाली; परंतु त्याचबरोबर पैसा हे मानवी यशाचे मोजमाप

बनले. जीवनाकडे पाहण्याची दृष्टी भोगवादी बनू लागली. मानवी

जीवनात यांत्रिकपणा आला.