स्वत:ला ओळखा
आपल्या प्रत्येकाला काही ना काही गुण, कौशल्य परमेश्वराने दिलेले
आहे. पण ते ज्याला त्याला जाणवावे लागते. ज्यांना अशी स्वची ओळख वेळेवर
पटते अशी माणसे जगात थोडीच असतात. यासाठी मी आणि माझे या चक्रातून
त्याने बाहेर
पडले पाहिजे. बाहेरच्या जगात थोडे डोकावून बघितले पाहिजे. तटस्थपणे स्वत:कडे पाहिले
पाहिजे. तरच स्वत:ची खरी ओळख पटू शकेल. परमेश्वराने माणसाला बुद्धी दिली आणि
स्वत:साठी
तिचा उपयोग कसा करायचा याला चालना मिळावी अशी कल्पकताही दिली.
या जगात स्वत:ला ओळखायला शिकणं ही मोठी मुश्कील गोष्ट आहे. आपल्यातील गुण, शक्ती ओळखणं,
आंतरिक प्रेरणा ओळखणं, स्वत:च्या आत्म्याचा आवाज ओळखणं अतिशय महत्त्वाचं आहे. ज्यावेळी तुम्ही तो
ओळखाल, तो तुमच्या आयुष्यातील महत्त्वाचा क्षण असेल.
स्वत:ची आंतरिक शक्ती ओळखणारे फार कमी असतात. स्वत:ला ओळखणं सगळ्यात
कठीण आणि मोठं महत्त्वाचं काम आहे.
जेव्हा आपण रोजच्या रहाटगाडग्यातून बाहेर पडून, शांतपणे, तटस्थपणे
स्वतःकडे पाहतो,
आत्मपरीक्षण करतो,
तेव्हाच तो स्वत:बद्दल विचार करू
शकतो. स्वतःशी संवाद साधतो, त्याचवेळी तो स्वत:ला ओळखू शकतो.
जेव्हा स्व चा शोध लागतो, तेव्हा त्याच्या आतील ईश्वरी अंश
जागृत होतो.
त्याच्यामध्ये दैवी शक्तीचा संचार होतो.
प्रोफेसर विलियम जेम्स यांच्या म्हणण्याप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीत
दडलेल्या, सुप्त शक्तीची त्याला स्वत:लाही आणि दुसऱ्या कुणालाही कल्पना
नसते. जर चुकूनमाकून हृदयाचा अशा प्रकारचा, माणसाची कुवत दाखवणारा
एक्स रे काढला,
तर माणसाला त्याच्या आतल्या शक्तीची कल्पना येईल आणि
तो आश्चर्यचकित होईल. काही वेळा माणसाच्या हातून असं भन्नाट काम
होऊन
जातं, की विचार केला तर त्याचं त्यालाच आश्चर्य वाटतं की मीच हे काम
केलं का?
तुमच्या आतमध्ये कितीतरी गुणांची, वैशिष्ट्यांची,कलांची खाण आहे,
हे तुम्हाला कुठे माहीत आहे? तुमचं खरं रूप माहीत नसेल, तुमच्या गुणापासून
तुम्ही जर अनभिज्ञ असाल तर तुम्ही काहीच काम करू शकणार नाही.
सुप्रसिद्ध
विचारवंत इमर्सन याच्या म्हणण्याप्रमाणे, फारच थोड्या लोकांना जिवंत
असेपर्यंत आपल्यातल्या शक्तीची ओळख पटते. बहुतेकांना
त्यांच्यातल्या खऱ्या
कौशल्याची ओळख न पटताच, हे जग सोडून जातात. कित्येकवेळा
एखाद्या
बलवान माणसाला त्याच्या बळाची ओळख करून द्यायला जागे करावे लागते.
कित्येक वेळा तुमचे कार्य करत असताना बरेच कष्ट पडतात. अनेक
अडचणी येतात. त्या संकटांशी सामना करताना तुमच्या आतल्या सुप्त
शक्तीचा
सुगावा लागतो. एका लेखकाचे लेखन साभार परत आल्यावर त्या ईर्ष्यनेच
त्याच्यामधली प्रतिभा जागी झाली. काही लोकांची प्रतिभा इतकी लपलेली
असते की तिला एखादी विशेष घटनाच जागृत करू शकते. नेहमीच्या दैनंदिन
जीवनात तिला उजाळा मिळत नाही. भयानक घटनांनी त्यांच्या प्रतिभेला
आव्हान मिळते. आणि दुप्पट वेगाने ती बाहेर येते. काही झाडांच्या
पानांना ती
चुरडल्यानंतर सुगंध येतो. त्याप्रमाणे, संकट कोसळल्यावरच काही माणसांमधले
गुण बाहेर येतात. संकट नसेल तर, त्यांच्यातली चमक दिसून येत नाही.
त्यांचे
अर्धे अधिक जीवन फुकटच जाते. अकस्मात एखादा भूकंप व्हावा तशी घटना
घडल्यावर त्यांच्या प्रतिभेवरची धूळ झटकली जाते. आणि ती नव्या
दमाने
जागृत होते.
आत्मज्ञान आणि स्वत:ची ओळख यामुळेच आपला विकास होत असतो.
स्वत:चा योग्य परिचय झाल्यावरच आपल्या आतल्या शक्तीचा त्याला अंदाज
येतो. आणि तो स्वसामर्थ्याचा योग्य प्रकारे उपयोग करून तो आपले
ध्येय
साध्य करतो. अनादी काळापासूनच माणसाच्या सामर्थ्याची ही कहाणी आहे.
आपल्या प्रयत्नाच्या मार्गावर चालत राहा. पुढेपुढे जात राहा. माणसाच्या
कौशल्याला, ज्ञानाला, यशाला काही सीमाच नाही. स्वत:ची ओळख झाल्यावर
आपल्या विकासाला,
ऐश्वर्याला, समृद्धीला पारावार राहत नाही.
आपल्याला बाकीच्या लोकांची ओळख करून घेण्याची इच्छा असते.
उत्सुकता असते. पण तेवढी उत्सुकता स्वतःची ओळख करून घेण्यात नसते.
कित्येकवेळा स्वसामर्थ्याची ओळख नसल्याने भीती वाटते. स्वतःमधले
गुण
आणि दोषही ओळखता आले पाहिजेत. आपल्यातले दोष घालवण्याचा प्रयत्न
केला पाहिजे. स्वत:ची ओळख आपल्यामधल्या छोट्या छोट्या भावभावनांतून
करून घ्यायची असते.
व्यक्तिमत्त्व विकासात स्वत:ला ओळखणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे
तुमचे व्यक्तित्व कसे आहे यावर ते कसे फुलवायचे हे कळते.
एखाद्याच्या
भिडस्त व्यक्तिमत्वाला अनुसरून, त्याला अवगत असलेले कौशल्य पणाला
लावून त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे प्रत्येकाला आपले
व्यक्तिमत्त्व
कसे आहे हे जसे शोधले पाहिजे तसेच आपल्यातले सुप्त कौशल्य काय आहे
हेसुद्धा शोधून काढले पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टींचा मिलाफ होऊन
एक छानसे
व्यक्तिमत्त्वही तयार होईल आणि यशाच्या दृष्टीनेही पुढे जाता येईल,
प्रा. विल्यम जेम्स म्हणतात, आपल्या प्रत्येकाजवळच शक्तीचा अद्भुत
साठा असतो. हा साठा इतका विशाल असतो, की आपण त्याची कल्पनाच
करू शकत नाही. पण आपल्या शक्तीची आपल्याला कल्पना नसते. अणूमधल्या
प्रचंड शक्तीची कल्पना माणसाला कुठे होती? पण विसाव्या शतकात अणूच्या
पोटातले सामर्थ्य माणसाला सापडले. पूर्वी ही शक्ती माणसाला माहीत
नव्हती
इतकेच. तशीच जर आपल्याला स्वत:मधल्या सामर्थ्याची ओळख पटली, तर
त्याला आत्मशक्तीचे भान येईल. आणि तो अणूसारखे प्रचंड कार्य करू
शकेल.
कित्येक वेळा व्यक्तीमध्ये उत्तम गुण असतात, सामर्थ्य असते. मोठे
होण्यासाठी लागणारे सर्व काही असते. पण निव्वळ आळशीपणामुळे आणि
उत्साह नसल्याने स्वत:च्या उत्कर्षाचे स्वप्न त्यांना पडत नाही.
ज्याक्षणी
तुम्हाला स्वतःचा उत्कर्ष करायची प्रेरणा मिळेल तो क्षण पकडा. ती
संधी
दवडू नका. हा क्षण आपोआप येईल किंवा एखाद्या संकटामुळेही तुमची
सुप्त
शक्ती जागृत होईल. तुमच्यातील सुप्त गुणांचा विकास होण्यासाठी
प्रेरणादायक पुस्तके वाचा. तुमच्यावर प्रभाव पाडणारे पुस्तक सतत
जवळ
ठेवा. त्याच्या सतत वाचनामुळे तुम्हाला तुमचा आदर्श आणि ध्येय
नेहमी
नजरेसमोर राहील. तुमचे स्वत्व जागवायला मदत होईल. तुमच्यातला
लपलेला गुण, ईश्वराने 'तुमच्या ठायी ठेवलेली शक्ती, तुम्हालाच शोधायची
आहे. कधी तुम्हाला जाणवलेला तुमच्यातलाच लहानसा गुण असतो; पण
त्याचा विकास केला तर तुमच्या व्यक्तिमत्त्वात भर पडून तुमची
प्रगती होऊ
शकते.
वटवृक्षाचे बी मोहरीच्या दाण्यापेक्षाही फारच बारीक असते. त्या
बीजात
तो महान वृक्ष अप्रगट अवस्थेत असतो. त्याला योग्य परिस्थिती मिळाली
की
तो प्रगट होतो. बीजातला वटवृक्ष जो ओळखतो, तोच समर्थ कार्य करू शकतो.
आपली ओळख करून घ्यायची म्हणजे आपल्यामध्ये बीजरूपाने ज्या अप्रगट
शक्ती आहेत त्यांची ओळख करून घेणे. प्रत्येक माणसात कार्य करण्याची
अमर्याद शक्ती असते. पण आपली शक्ती विखरून पडलेली असते. त्यामुळे
आपल्याजवळच्या शक्तिसंचयाचा अंदाज येत नाही. सूर्यकिरणात किती
सामर्थ्य
आहे ते आपल्याला समजत नाही. पण तेच सूर्यकिरण जर भिंगातून एकत्र
केले
तर कागदही जळू शकतो.
एक उदाहरण अगदी माझ्या कुटुंबातले आहे. माझ्या नात्यातल्या एक
बाई. वयाच्या साठीत त्यांनी संगीत शिकायला घेतले. त्यानंतर त्यात
त्यांनी
बी. ए. केले. (विवाहानंतर गाणे शिकताना अधेमधे संसारात त्यांच्या
गाण्यात
खंड पडला होता.) एम. ए. केले. एवढ्यावर त्या थांबल्या नाहीत.
त्यांनी
वयाच्या सत्तरीत मॉडेलिंग सुरू केले. घरात या क्षेत्राची कोणतीही
पार्श्वभूमी
नसताना. त्यांनी आजवर जवळ जवळ पन्नास जाहिरातपटात काम केले आहे.
महिलादिनाला त्यांचा सत्कार झाला.
तुम्हाला स्वत:चे जे गुण माहीत आहेत, त्यापेक्षा कितीतरी पट जास्त गुण
तुमच्या आतमध्ये दडलेले असतात याचे प्रत्यंतर तुम्हाला आल्याशिवाय
राहणार
नाही त्यासाठी फक्त तुमच्या आतमध्ये तुम्ही डोकावून बघितलं पाहिजे.
ज्यावेळी
तुमचं खरं सामर्थ्य, तुमच्यातले गुण कळतील तेव्हा तुम्ही
आजचे राहणार नाही.
तुम्ही कितीतरी श्रेष्ठ ठराल आणि त्या आत्मविश्वासानेच
आजच्यापेक्षा कितीतरी
पट श्रेष्ठ कार्य करू शकाल. तुमच्या अंतरंगात अमर्याद शक्ती भरलेली
आहे, पण
ती गुप्त आहे. जेव्हा ती प्रगट होईल तेव्हा तुम्ही स्वत:च तिला
ओळखणार नाही.
तुमच्या आतल्या सुप्त शक्तीचा थोडासा जरी अंश तुम्हाला कळला तरी
तुमच्या आयुष्याचे सार्थक होईल. तुम्ही तुमच्या आत्मशक्तीला जागृत
करा
आणि काय चमत्कार होतो पहा! या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची
वाटते ती म्हणजे,
तुम्ही गुणहीन लोकांच्या सहवासात राहू नका. कारण 'संगती
संग दोषेण' या न्यायाने तुम्हीही तसेच व्हाल. तुमची ताकद तुम्हाला कळणारच
नाही. काही वेळेला तुमची सुप्त शक्ती बाहेर काढताना अनेक अडचणी
येतात.
पण या अडचणी दूर करून तुमचा रस्ता तुम्हालाच शोधायचा आहे. तुमच्या
जीवनात कधी क्रांती होईल सांगता येत नाही. त्यासाठी तुम्ही मात्र
सदैव तयार
राहा. कधी कुणाचं भाषण ऐकून, एखादं पुस्तक वाचून, तर कुणाची कला
पाहून तर कुणाच्या आयुष्याचा पट, तर कधी कुणाचे अपयश पाहून तुमच्यातील
स्पार्क जागा होईल आणि तिथून तुम्हाला स्फूर्ती मिळेल.
तुमच्यातल्या सुप्त
शक्ती जाग्या झाल्या की तुमची प्रगती आपोआप व्हायला लागेल. मग तुम्हाला
बाहेरच्या मदतीची गरज भासणार नाही.
