पूर्ण उमललेले व्यक्तिमत्व

 

पूर्ण उमललेले व्यक्तिमत्व

पूर्ण उमललेले व्यक्तिमत्व


 व्यक्तिमत्वाची प्रगल्भता

फळ ज्याप्रमाणे विशिष्ट काळानंतर, पिकते, त्याप्रमाणे आपले वय जसजसे

वाढत जाते, तसतसे आपले व्यक्तिमत्व प्रगल्भ होत जाते. विविध अनुभव येतात,

समज वाढते. ही प्रगल्भता (मॅच्युरिटी) नैसर्गिकरित्या, स्वाभाविकपणे येते.

अगदी लहानपणी पेढा, लाडू, पेरू असे पदार्थ समोर दिसले की, केव्हा

एकदा ते तोंडात टाकतो असे होते. आपल्याला ते मानवेल का, इतरांनी ते खाल्ले

आहे की नाही, असे विचारही मनात येत नाहीत. स्वतःचे तात्कालिक सुख तेव्हा

महत्त्वाचे वाटते. पण वय जसे वाढते तसे वास्तवाचे भान येत जाते. आपल्या इच्छा,

आकांक्षा व्यवहार्य बनत जातात. त्या पूर्ण होण्यावर परिस्थितीने पडणाऱ्या मर्यादांची

जाणीव होते. दूरच्या सुखासाठी तात्कालिक सुखावर पाणी सोडण्यास मन तयार

होते.

अंधार, एकांत यांची बालपणी भीती वाटते, कारण त्याविषयीचे ज्ञान नसते.

आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीविषयी माहिती हवी असल्यामुळे मुले कुतूहलाने सतत

प्रश्न विचारतात. विविध प्रकारे या प्रश्नांना उत्तरे मिळतात आणि असा अज्ञानाकडून

ज्ञानाकडे प्रवास होत असतो. २-४ वर्षांच्या मुलांना स्वतःचे चित्र काढायला सांगितले

की ते जे काढतात, त्यावरून ते माणसाचे चित्र आहे असेसुद्धा वाटत नाही! त्यांची

स्वतःविषयीची कल्पना अतिशय धूसर असते. पण मोठेपणी ती स्पष्ट होते. तसेच

मोठेपणी परिस्थिती, वातावरण, भोवतालच्या घटना यांविषयीही अधिकाधिक माहिती

मिळत जाते.

नुकतेच जन्मलेले बाळ स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या

अन्नग्रहण करणे, स्वसंरक्षण करणे अशा मूलभूत क्रियासुद्धा करू शकत नाही. ते

अगदी कोवळे असते, असमर्थ असते आणि त्यामुळे परावलंबी असते. हळूहळू बाळ

 चालते, बोलते, मारामारी करते. म्हणजेच मग शारीरिक आणि त्याचबरोबर मानसिक,

आत्मिक सामर्थ्यही त्याला प्राप्त होते. मूल स्वावलंबी होते. स्वतः निर्णय घेऊ

शकते. भावनिक स्वावलंबन मिळते, स्वतःची प्रसन्नता राखू शकते.

बाल्यावस्थेमध्ये स्वतःच्या शरीरावरच आपले प्रेम असते. नंतर असे म्हणतात

की, मुलींना वडिलांबद्दल आकर्षण असू शकते आणि मुलांना आईबद्दल आकर्षण

असू शकते. ८-१२ वर्षांचे वय असताना मुले मित्रांमध्येच व मुली मैत्रिणींमध्येच

रमतात. लहानपणी जरी अशा संदिग्ध, बदलत्या आकर्षण-भावना असल्या, तरी

तारूण्यामध्ये निश्चित. भिन्नलिंगी आकर्षण निर्माण होते आणि ते नैसर्गिकच आहे.

या आकर्षणाची परिणती पुढे मैत्री, विश्वास, परस्पर-समजूत व परस्पर -अवलंबन

यांवर आधारलेले प्रेम यांत व्हायला हवी. त्या प्रेमाला नीतीचे अधिष्ठान असावे.

आयुष्याला सुरूवात होते तेव्हा आपल्या जीवननौकेची दिशा निश्चित नसते.

विशिष्ट मूल्ये, ध्येये उद्दिष्टे समोर नसतात. पण हळूहळू जीवनप्रवासाचा मार्ग

सापडत जातो. कुठे कसे आणि का जायचे ते समजत जाते. वर्षांची पाने उलटत

जातात आणि मूल्यहीनतेकडून मूल्यांकडे स्वाभाविक प्रवास होत जातो.

आपण का जगतो या प्रश्नाचे प्रत्येकाचे उत्तर वेगवेगळे असते. 'ऋणं कृत्वा

घृतं पिबेत्' असे म्हणणाऱ्यांच्या लेखी आयुष्य हे खाणेपिणे, मौजमजा करणे यासाठीच

असते. काहींना आपण मुले-बाळे व इतर कुटुंबीय यांच्यासाठीच जगतो असे वाटते.

काहींची जीवनमूल्ये आपली जात, धर्म, समाज इथपर्यंत विस्तारलेली दिसतात. तर

काही लोकोत्तर व्यक्तींची जीवनाची ध्येये आपले राष्ट्र, मानवजात, अखिल सृष्टी

यांना व्यापणारी असतात. म्हणजे प्रत्येकाला जीवनमूल्य हे असतेच. फक्त त्याचा

दर्जा, त्याची व्यापकता भिन्न असते. सत्य, शिव, सुंदर अशा मूल्यांबरोबरच सेवा,

त्याग, दया, न्याय अशीही मूल्ये असू शकतात. ही नैतिक मूल्ये आपल्या कृतीला,

जीवनाला अर्थ प्राप्त करून देतात आणि सर्वसाधारण व्यक्तिमत्त्वाचे विमल चरित्रात

रूपांतर करतात.

आपण का जगतो याप्रमाणे आपण कसे जगतो, जीवनमूल्ये प्राप्त करण्यासाठी

कोणत्या मार्गांनी जातो हेही महत्त्वाचे असते. या जगण्याच्या पद्धतीला जीवनरीती

म्हणता येईल. श्रीमंत व्हायचे असे जगण्याचे कारण ठरल्यास, काम गाळून श्रीमंती

मिळवायची की, वाममार्गाने पैसा मिळवायचा हेही महत्त्वाचे आहे. शेवटी आपण का

व कसे जगतो, म्हणजेच आपली जीवनमूल्ये व जीवनरीती यांच्यावरून प्रत्येकाच्या

जीवनाचे तत्त्वज्ञान किंवा जीवनदर्शन' ठरते.